सांगली : राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल (एसईबीसी) तसेच ओबीसी प्रवर्गातील मुलींना शंभर टक्के शिक्षण शुल्क माफी दिली आहे. अभिमत विद्यापीठांसाठीही असा निर्णय घेण्याची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना राज्यातील काही विद्यार्थ्यांनी पत्र पाठविले आहेत.राज्य शासनाने ३० ऑगस्ट २०२४ रोजी परिपत्रक काढून राज्यातील शासकीय वैद्यकीय, शासन अनुदानित वैद्यकीय, महापालिका वैद्यकीय तसेच खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना १०० टक्के शुल्क सवलत लागू केली. यातून अभिमत विद्यापीठांना वगळण्यात आले आहे. राज्यभरातील काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून अभिमत महाविद्यालयांमध्येही सवलत लागू करण्याची मागणी केली आहे.अभिमत विद्यापीठांच्या व्यवस्थापन कोट्यात कोणतीही सवलत न देता गुणवत्तेवर आधारित दिल्या जाणाऱ्या प्रवेशांसाठी ही सवलत लागू करण्याची मागणी केली आहे, असा निर्णय झाल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. ऑल इंडिया तसेच स्टेट कोट्यातून सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अद्याप प्रवेशाच्या दोन फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे शासनाने निर्णय घेतल्यास अभिमत महाविद्यालयांमधील प्रवेशाचा मार्ग अनेकांना खुला होईल, असे विद्यार्थ्यांनी सुचविले आहे.
..हा तर मुलींवर अन्यायपुणे जिल्ह्यातील सौम्या काळे या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाने मुलींना सरसकट शंभर टक्के फी माफी केली. मात्र, पात्र असतानाही अभिमत विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना शुल्क माफी नसल्याने शेकडो मुलींना प्रवेश घेता येत नाही. हा अन्याय आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.