शिराळा : शिराळा उतर भागामधील अनेक गावांमध्ये गुढीपाडव्या दिवशीच यात्रा असतात, परंतु गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. औंढी, पाडळी, पाडळेवाडी, निगडी, शिराळा गावातील लोकांचे कुलदैवत असणाऱ्या औंढी (ता. शिराळा) येथील सिद्धेश्वराच्या मूर्तीस शासकीय नियमानुसार शिराळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनीता निकम यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला.
शिराळा उत्तर भागात गुढीपाडव्याच्या दिवशी औंढी, शिराळा, पाडळी, पाडळेवाडी, निगडी, दुरंदेवाडी, खेड, भटवाडी, वाकुर्डे, आदी गावच्या यात्रा असतात, परंतु कोरोणामुळे शासनाच्या आदेशानुसार सर्व यात्रा, जत्रा, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. दुरंदेवाडी-औंढी येथील सिद्धेश्वराचे मंदिर शिराळा उत्तर भागासह शिराळा शहरातील अनेकांचे कुलदैवत आहे. मंदिराचे पुजारी युवराज गिरी, रमेश गिरी व दीपक गिरी यांनी नियम पाळत, नगराध्यक्षा सुनीता निकम, त्यांचे पती चंद्रकांत निकम यांच्याहस्ते पहाटे पाच वाजता सिद्धेश्वराच्या मूर्तीला अभिषेक घातला. सकाळी पाडळेवाडीच्या सरपंच पुष्पा पाटील व त्यांचे पती आदीक पाटील यांच्याहस्ते जाग्यावरच पालखीचे पूजन केले. भाविकांसाठी मंदिर दिवसभर बंद ठेवण्यात आले होते.