सांगली : श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात बुधवारी ४५० परदेशी पाहुण्यांनी जलाभिषेकात सहभाग घेतला. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुण्यासह महाराष्ट्रातील जैन समाजासाठी २३ रोजी विशेष अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी एक हजारहून अधिकजण श्रवणबेळगोळकडे रवाना झाले आहेत.भगवान बाहुबली स्वामी यांच्या मूर्तीवर नऊ दिवस मस्तकाभिषेक होणार आहे. १७ फेब्रुवारीपासून या मस्तकाभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बुधवारी अनिवासी भारतीय व परदेशी व्यक्तींसाठी अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. युगांडा, दक्षिण अफ्रिका, जर्मनी, इंग्लंड, इस्त्राईल, श्रीलंका, तुर्की अशा विविध देशातून आलेल्या ४० जैनेत्तर लोकांनी अभिषेक केला. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, रशिया, चीन, जपान या देशात राहणाºया ४०० हून अधिक जैन समाजातील भाविकांनी मस्तकाभिषेक केला.कर्नाटक सरकारने उभारलेल्या सभामंडपात या परदेशी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सव समितीच्या अध्यक्षा सरिता जैन, राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, विनोद दोड्डणावर, सतीश जैन आदींसह महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांनीही परदेशी पाहुण्यांना आशीर्वाद दिले. २३ रोजी होणाºया जलाभिषेकासाठी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, नाशिक या परिसरातील १हजारहून अधिकांनी नोंदणी केली.
परदेशी पाहुण्यांच्या हस्ते ‘बाहुबली’ अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:05 AM