सांगली : माहेराहून एक लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून पतीने तिच्या पोटात बुक्की मारली. तसेच पतीसह चौघांनी माहेरी जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे विवाहितेचा गर्भपात झाला. याप्रकरणी तेहसीन जुनेद तांबोळी (वय २५, रा. कसबे डिग्रज, सध्या रा. शंभरफुटी रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार पती जुनेद मुसा तांबोळी (वय ३०), दुल्हन मुसा तांबोळी (वय ४५), मुसा महंमदगौस तांबोळी (वय ५२, रा. आकाशवाणीजवळ), तबस्सुम मुसा तांबोळी (वय ३६, शामरावनगर) यांच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी, कसबे डिग्रज येथील तेहसीन हिचा सांगलीतील जुनेद तांबोळी याच्याशी विवाह झाला आहे. विवाहानंतर दि. ४ जून २०२३ पासून सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मानपान केला नाही, त्यामुळे माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये किंवा तेवढ्या किमतीचे सोने आणण्यासाठी तगादा लावला. तेहसीन हिने पैसे आणले नाहीत म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.तेहसीन ही गर्भवती असतानाही पती जुनेद याने तिला, ‘तुझ्या पोटातील मूल मला नको आहे’ असे म्हणून गर्भपात करण्यासाठी आग्रह केला. तेहसीन हिने नकार देताच, ‘तू मूल जन्माला कसे घालतेस ते बघतो’ असे म्हणून जुनेदने तिच्या पोटावर जोराने बुक्की मारली. तसेच पती जुनेद, सासू दुल्हन, सासरे मुसा, तबस्सुम यांनी माहेरी जाऊन तेहसीनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिची आई सोडवण्यास आली असताना त्यांनाही मारहाण केली.मारहाणीत तेहसीनला त्रास होऊ लागल्यामुळे तिचा पोटातील गर्भाचा जीव धोक्यात आला. त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला. या छळाला कंटाळून तेहसीन हिने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गर्भाच्या मृत्यूबद्दलही गुन्हातेहसीनच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे जन्मापूर्वीच गर्भास मारून टाकण्याचे कृत्य केले. त्यामुळे चौघांविरूद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ९१ नुसार आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.