संगली/कडेगाव : ‘भारत जोडो’ यात्रेत सोमवारी मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे १२ हजार कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धरीत्या हिंगोली जिल्ह्यातील यात्रामार्गावरून मार्गक्रमण केले. मुलींनी लेझीम, तर तरुणांनी झांज व लेझीम प्रात्यक्षिके आणि धनगर समाजबांधवांनी पारंपरिक वेशात ढोलवादन करून सांगलीच्या कला-संस्कृतीचे दर्शन घडवले. हे सादरीकरण व सांगलीकरांचा प्रेम, जिव्हाळा पाहून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी भारावून गेले.
भारत जोडो पदयात्रा मार्गक्रमण करीत असताना सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्ते हिंगोली येथे सहभागी झाले. यावेळी विविध समाजघटकातील लोकांना राहुल गांधी यांनी आवर्जून जवळ बोलवून विचारपूस केली. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व डॉ. पतंगराव कदम यांचा उल्लेख करीत सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले. विविध पथकांनी सांगलीच्या कला-संस्कृतीचे दर्शन घडवले. राहुल गांधी यांच्यासह नेत्यांना तुळस आणि मंजिरीचा मोठा हार घालण्यात आला. सांगलीकरांच्या प्रेम, जिव्हाळ्याचे व शिस्तीचे आणि चांगुलपणाचे कौतुक राहुल गांधी यांनी केले. ‘व्हेरी गुड’ म्हणत कौतुकाची थाप दिली. यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा यात्रामार्गावरून चालण्याचा उत्साह आणखी वाढला.
प्रतीकात्मक बैलगाडी भेट
बैलगाडी महाराष्ट्रातील कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडीची लाकडी प्रतिकृती जिल्हा काँग्रेसच्यावतीने आमदार डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, नगरसेवक मयूर पाटील यांनी राहुल गांधी यांना भेट दिली. पृथ्वीराज पाटील यांनी बेदाण्याचा हार घातला.
धनगरी ढोलवादन
जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी यात्रा मार्गावर ढोलवादन करत परिसर दणाणून सोडला. यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः गळ्यात ढोल घेऊन ढोलवादन केले.