सांगली ,दि. २३ : दिवाळी बाजारात पूजा साहित्यासाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. दिवाळीच्या काळात तब्बल ३४१ टन कचरा उठाव करण्यात आला.
दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असतो. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात यासाठी महापालिकेची यंत्रणा राबत असते. मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रेते पूजा साहित्य व दिवाळीच्या अन्य साहित्याचे स्टॉल लावत असतात.
दिवाळीचा पाडवा संपल्यानंतर स्टॉल्स काढले की संपूर्ण कचरा रस्त्यावरच पडतो. फुले व अन्य पूजा साहित्याचा कचरा यामध्ये सर्वाधिक असतो. महापालिकेने मुख्य बाजारपेठांबरोबरच शहरातील प्रत्येक भागातील कचरा उठाव केला.
गुरुवारी लक्ष्मीपूजनादिवशी १२७, पाडव्यादिवशी १०३ आणि शनिवारी १११ टन कचऱ्याचे संकलन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले. यातील ८० टन कचरा प्रभाग एक आणि दोनमधून, प्रभाग तीनमधून १६५ टन आणि मिरजेतून १६५ टन कचरा गोळा करण्यात आला.
याशिवाय नियमितचा कचरा उठावही करण्यात आला. नियमितच्या कचरा संकलनात यंदाच्या दिवाळीत १८९ टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडली.
कर्मचाऱ्याचे कौतुकदरवर्षीप्रमाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला तीन दिवस सातत्याने कचरा उठाव करून बाजारपेठा व अन्य भागातील स्वच्छता ठेवली.