इस्लामपूर : खासगी सावकारीतून दिलेल्या ७ ते ८ लाख रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावून बनेवाडी (ता. वाळवा) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेणाऱ्या घटनेतील फरारी सावकरास पोलिसांनी अटक केली. त्याला येथील न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. श्रीकांत चिमणराव जाधव (वय ४०, रा. ताकारी) असे अटकेत असणाऱ्या सावकाराचे नाव आहे. या गुन्ह्यात तीन सावकारांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. २२ डिसेंबर २०१५ रोजी ही घटना घडल्यापासून श्रीकांत जाधव हा फरारी होता. याबाबत संजय महादेव खोत (रा. पडवळवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बनेवाडी (ता. वाळवा) येथील संजय भीमराम यादव (वय ४५) यांनी आपल्या व्यवसायासाठी तसेच अन्य मित्रांसाठी मध्यस्थी करीत ताकारी येथील तीन, तर बोरगावमधील एक अशा ४ सावकारांकडून वेळोवेळी सावकारी व्याजाने पैसे घेतले होते. व्याज आणि दंडासह ही रक्कम ८ लाखाच्या घरात गेली होती. डिसेंबरपूर्वी सहा महिन्यांपासून चारही सावकारांनी संजय यादव यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. सावकारांनी घरासह दावणीची म्हैस घेऊन जाण्याची धमकी देतानाच संपूर्ण कुटुंबास जगू देणार नाही, असेही धमकावले होते. शेवटी सावकारांच्या या त्रासाला कंटाळून संजय यादव याने आपला ४ वर्षे वयाचा मुलगा राजवर्धन आणि सहा महिने वयाची मुलगी समृध्दी यांचा तोंड दाबून व गळा आवळून खून केला. त्यानंतर पत्नी जयश्रीसह त्याने घरातच दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेपूर्वी त्याने मुलाच्या पाटीवर सावकारांची नावे लिहून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. त्यानुसार पोलिसांनी चार सावकारांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. श्रीकांत जाधव हा घटनेपासून फरारी राहिला होता. दरम्यानच्या मुदतीत त्याने अंतरीम जामीन मिळवण्याचाही प्रयत्न केला; मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. शेवटी पोलिसांनी शनिवारी त्याला अटक करून येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याला २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ताकारीतील फरार सावकारास अटक
By admin | Published: March 20, 2016 12:17 AM