बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीच्या सदस्या परवीन शेरकर या गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीस गैरहजर हाेत्या. याबाबत तक्रारी आल्यानंतर कारभाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या घरी जाऊन प्राेसिडिंगवर सह्या घेणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कारकुनास शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य सतीश हिवरे यांनी रंगेहात पकडले. त्याला दप्तरासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्यासमाेर हजर केले असता, गुडेवार यांनी याप्रकरणी चाैकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.
बुधगाव येथील ग्रामपंचायत सदस्या परवीन शेरकर निवडून आल्यापासून ग्रामपंचायतीच्या बैठकीस वारंवार गैरहजर असतात. मार्च महिन्यात झालेल्या बैठकीनंतर गेल्या सहा महिन्यात त्या एकदाही ग्रामपंचायतीत आलेल्या नाहीत. यामुळे शिवसेनेचे सदस्य सतीश हिवरे यांनी ग्रामपंचायतीच्या गेल्या दाेन वर्षातील मासिक बैठकांच्या अहवालाची मागणी ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांच्याकडे केली हाेती. मात्र ते टाळाटाळ करीत हाेते.
मंगळवारी सकाळी शेरकर या ग्रामपंचायत कार्यालयात आल्या. त्यावेळी हिवरे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित हाेते. यामुळे त्या प्राेसिडिंगवर सह्या करू शकल्या नाहीत. मात्र दुपारी दत्ता काेळी हा ग्रामपंचायतीचा कारकुनच त्यांच्या घरी दप्तर घेऊन जाऊन सह्या घेऊन आला. ताे हिवरे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमाेर रंगेहात सापडला. हिवरे यांनी त्यास थेट अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्यासमाेर हजर केले. गुडेवार यांनी याप्रकरणी चाैकशी करून दाेषींवर कारवाईचे आदेश दिले.