सांगली : नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वासुदेव उर्फ रोहित दादासाहेब चव्हाण (वय २७, रा. रविवार पेठ, माधवनगर, ता. मिरज, सध्या जुना हरीपूर रस्ता, तेलगू चर्चजवळ, समतानगर, मिरज) याला २२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने सुनावली. जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केला.रोहित चव्हाण याला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) दोषी धरण्यात आले. २२ वर्षे सश्रम कारावासासोबत ५० हजार रुपये दंडही भरायचा आहे. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन व रोहितच्या नातेसंबंधातील आहे. रोहितने नात्याचा व तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.मिरजेत समतानगरमध्ये भाड्याच्या खोलीत, ख्वाजा वस्तीमध्ये आपल्या बहिणीच्या घरात व माणिकनगरमध्ये रेल्वेच्या पडक्या खोलीत अत्याचार केले. १ फेब्रुवारी ते २० मार्च २१ या कालावधीत हा प्रकार घडला. तिने विरोध केला असता, तिच्या आजीला व वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याची माहिती मिळताच तिच्या आजीने मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरिक्षक पी. सी. बाबर यांनी केला. पोलिस कर्मचारी अमोल पाटील, सुनिता कांबळे, रुक्मिणी जुगदर यांनीही तपासात भाग घेतला.
जास्तीजास्त शिक्षेची मागणीखटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. पिडिता व तिच्या आजीचा, पंच आणि डॉक्टरांचा जबाब नोंदविला. रोहितने नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने जास्तीजास्त शिक्षा ठोठावण्याची मागणी सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी केली.