आरवडे (ता. तासगाव) येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांच्या खरड छाटणीस सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मांजर्डे : तासगाव तालुक्यातील पूर्व भागातील द्राक्ष हंगाम संपून आता द्राक्ष बागायतदार खरड छाटणी घेत आहेत. परिसरातील वातावरणाचा अंदाज घेऊन बागायतदार आपल्या छाटणीची तारीख निश्चित करत आहेत. भागातील सर्वच बागांची एप्रिलमध्ये छाटणीची कामे पूर्ण करण्यासाठी बागायतदार प्रयत्न करत आहेत.
मांजर्डे, आरवडे, पेड, बलगवडे, गौरगाव या भागातील द्राक्षबागांची छाटणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. भागातील सर्वच द्राक्ष बागायतदार आपल्या बागेची छाटणी पुढील काळात वेलीला मिळणारे तापमान आणि पाण्याची उपलब्धता यावर निश्चित करत असतात. एप्रिल छाटणीच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास संपूर्ण वर्षाच्या उत्पन्नास मुकावे लागते. म्हणून शेतकरी द्राक्ष छाटणीचे काटेकोर पालन करीत असतो. मागील दोन हंगामात द्राक्षशेती कोरोनाच्या महामारीत अडचणीत आली असली तरी, पुन्हा नव्या जोमाने पुढील छाटणीची कामे सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी ताकारी, आरफळ आणि विसापूर व पुणदी उपसा सिंचन योजनांच्या भरवशावर छाटणीची कामे उरकत आहेत.