करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथून जाणाऱ्या दिघंची-हेरवाड महामार्गावर लेंगरेवाडी ते आटपाडीदरम्यान पाईपलाईनसाठी रस्ता खुदाई करण्यात आली. या ठिकाणी मोठा गतिरोधक तयार झाला आहे. यामुळे दुचाकीवरून पडून शेटफळेतील महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सांगली येथे दाखल केले आहे.
आटपाडी तालुक्यात दिघंची-हेरवाड महामार्गाचे काम सुरू आहे. आटपाडी ते शेटफळे काम सध्या पूर्णत्वास आले आहे. हा महामार्ग अतिशय चांगल्या प्रकारे केला जात आहे.
मात्र दोन दिवसांपूर्वी लेंगरेवाडी ते आटपाडीदरम्यान सचिन पाटीनजीक टेंभूच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी ठेकेदाराने महामार्ग खोदून पाईपलाईन टाकली आहे. त्यावर मुरुमाचा मोठा ढीग केल्याने मोठा गतिरोधक तयार झाला आहे. या ठिकाणाहुन शेटफळे येथील सिंधुताई तुकाराम गायकवाड या पुतण्यासह दुचाकीवरून जात होत्या. यावेळी या खुदाईच्या ठिकाणी त्यांची दुचाकी घसरून पडल्याने सिंधुताई गायकवाड या जखमी झाल्या.
संपूर्ण महामार्ग तयार झाल्यानंतर बंदिस्त पाईपलाईन करणाऱ्या ठेकेदाराला जाग आली असून त्याने महामार्गच फोडल्याने अपघात घडत आहेत. महामार्ग पूर्ण होण्याअगोदर या ठेकेदाराला महामार्गावरील खोदकाम करण्याचे का सुचले नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित पाईपलाईन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.