मिरज (जि. सांगली) : मिरजमधून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर नवीन महामार्गाच्या बायपासवर वड्डी (ता. मिरज) येथे बुधवारी विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर व जीपच्या धडकेत जीपमधील सहा जण ठार, तर दोन मुली जखमी झाल्या. देवदर्शनास पंढरपूरला जात असताना ही दुर्घटना घडली. मृतांत सरवडे (कोल्हापूर) येथील पोवार कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. हा बायपास मंगळवारीच सुरू करण्यात आला होता.
जयवंत पोवार (वय ५४), पत्नी स्नेहल (४५), मुलगा सोहम (१२), कोमल शिंदे (६३), लक्ष्मण शिंदे (७०, मूळगाव बानगे, सध्या सुरत, गुजरात), जीपचालक उमेश उदय शर्मा (३०) यांचा मृत्यू झाला. जयवंत पोवार यांच्या मुली श्रावणी व साक्षी जखमी झाल्या.
दिशादर्शक फलकही नाहीत...रेल्वे पुलानजीक रखडलेले काम पूर्ण झाल्याने मंगळवारी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रस्ता सुरू झाला. मात्र, येथे काेणतेही माहिती फलक अथवा दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. यामुळे अनेक जण बिनबाेभाटपणे एकेरी मार्गिकेत वाहने दामटत आहेत. यामुळे रस्ता सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी भीषण अपघात होऊन सहा बळी गेले.