लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कापूसखेड येथील लाचखोर तलाठी सुनील बाबूराव जावीर (रा. मिरजवाडी, ता. वाळवा) याच्या साथीदार गणेश दिनकर पाटील (वय ४४, रा. कापूसखेड, ता. वाळवा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अटक केली. लाचप्रकरणात त्याने मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने कारवाई करण्यात आली. त्याला इस्लामपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, अशी माहिती लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांची आई वारस असलेली बागायत शेतजमीन आहे. ती जमीन इतर वारसांनी तक्रारदार यांच्या आईस विनामोबदला कायम व खूष खरेदीपत्राने स्वखुशीने लिहून दिलेली आहे. या खूष खरेदीपत्राचा ऑनलाईन फेरफार करण्याचे काम कापूसखेडच्या तलाठी जावीर याच्याकडे होते. तक्रारदार यांनी नोंदीचे काम झाले काय, याबाबत जावीर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्याकरिता पंधरा हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदविली.
त्यानुसार सापळा लावण्यात आला. ती रक्कम कार्यालयाच्या बाहेर असलेल्या त्याच्या चारचाकी वाहनात ठेवण्यास सांगितले. त्यावेळी गणेश पाटील याने जावीर यास सहकार्य केले. पाटील हा कापूसखेडमध्ये राहण्यास असून तो शेतकरी आहे. त्याची आणि जावीरची ओळख होती. लाचप्रकरणात त्याने जावीर याला मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.