सांगली : महापालिकेच्या लेखा विभागात बुधवारी दुपारी अधिकारी, कर्मचारी गैरहजर होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थायी समितीचे सभापती धीरज सूर्यवंशी यांनी लेखा विभागाच्या तीनही खोल्यांना टाळे ठोकले. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली. अखेर लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने सभापतींनी चाव्या सुपुर्द केल्या.
सभापती सूर्यवंशी यांच्या प्रभागातील विकासकामाची फाईल लेखा विभागात होती. त्यात आठवडाभरात सदस्यांची मुदत संपत आल्याने विकासकामे उरकण्यासाठी घाईगडबड सुरू आहे. चारवेळा फाईल लेखा विभागातून परत आल्याने सभापती संतापले होते. बुधवारी दुपारी त्यांनी लेखा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सभापती दालनात येण्याचे आदेश दिले होते. पण प्रतिक्षा करूनही अधिकारी, कर्मचारी फिरकले नाहीत. लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला पण तो त्यांनी उचलला नाही. अखेर सभापतींनी लेखा विभाग गाठला. त्याठिकाणी अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. अखेर सूर्यवंशी यांनी लेखा विभागाला कुलूप ठोकले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, संतोष पाटील उपस्थित होते. अखेर पाच वाजता कार्यालयाचे कुलुप काढण्यात आले.
महापालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १९ ऑगस्ट रोजी संपत आहे. अनेक विकास कामे मार्गी लावण्याबाबत प्रशासनाकडून गंभीरपणे घेतले जात नाही. लेखा विभागाकडून फाईलचा निपटारा लावला जात नाही. अनेक नगरसेवकांकडूनही तक्रारी केल्या जात आहे. प्रशासनाची या बाबींची गांभीर्याने दखल घ्यावी, असे सूर्यवंशी म्हणाले.
चौकशीनंतर कारवाई : सुनील पवार
लेखा विभागात अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने सभापती सूर्यवंशी यांनी कुलुप ठोकले. याबाबत आयुक्त सुनील पवार यांना विचारता ते म्हणाले की, याबाबत आपण माहिती घेत आहोत. कार्यालयीन वेळेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे बंधन आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत चौकशी करू. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.