दिलीप मोहितेविटा : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार अनिल बाबर यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात येऊन डिवचल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. खानापूर मतदारसंघातील वातावरण तापले आहे. पत्रकार परिषदांसह ‘सोशल मीडिया वॉर’ सुरू झाले असून, त्यात येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही उडी घेतल्यामुळे राजकीय ‘धुळवड’ सुरू झाली आहे.चार दिवसांपूर्वी खासदार राऊत यांनी विट्यात येऊन बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्या टीकेला बाबर यांनी जशास तसे प्रत्युत्तरही दिले. बाबर यांची राऊत यांच्यावरील टीका जिव्हारी लागल्याने दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी बाबर यांच्यावर निशाणा साधत ‘आमच्या एका सभेने एवढे वैफल्यग्रस्त कसे झालात?’ असा सवाल केला. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, राजू जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बाबर यांच्यावरील टीका सहन करणार नसल्याचे सांगत ठाकरे गटाला आव्हान दिले. दोन्ही गटाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे.बेगानी शादी में, अब्दुल्ला दिवानाखासदार राऊत यांचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी स्वागत केल्यानंतर आमदार बाबर गटाकडून सोशल मीडियावर बेगानी शादी में, अब्दुल्ला दिवाना अशी टीका सुरु झाली. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावरुन बाबर गटावर प्रतिहल्ला चढविला. खा. राऊत महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे नेते असल्याने त्यांचे स्वागत केल्याचे स्पष्टीकरण दिले.
शिंदे-ठाकरे गटाच्या शिवसेनेची राजकीय धुळवड, सांगलीतील विट्यात राजकीय वातावरण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 6:13 PM