सांगली : येथील इंदिरानगर झोपडपट्टीमधील २२ वर्षे फरारी आरोप संभाजी मोतीराम सकट यास गुरुवारी पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीचा वारंवार शोध घेऊनही पोलिसांना सापडत नव्हता.सांगली शहर पोलिसात २००२ मध्ये कलम ३२६, ३४ या गुन्ह्यातील संभाजी सकट फरार होता. गुन्हा घडल्यापासून पोलिसांना सापडत नव्हता. आरोपी सापडत नसल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी जाहीरनामा काढून सकट यास फरारी घोषित केले होते. विधानसभा निवडणुकीमुळे फरारींचा शोध घेण्याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते. सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यासाठी पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक नेमले होते. पथकातील विनायक शिंदे, योगेश सटाले, संतोष गळवे हे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना खबऱ्याकडून फरारी आरोपी संभाजी सकट हा त्याचे नातेवाईक मयत झाल्याने सांगली येथील इंदिरानगर झोपडपट्टी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचून सकट यास ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा गेली २२ वर्षे फरारी होता.
बावीस वर्षे फरारी आरोपीस सांगली पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 5:39 PM