सांगली : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर (वय २७, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) याला पोलिसांनी पकडल्यानंतर, दहा तासांत तो पुन्हा पसार झाला.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी सकाळी पेठनाका (ता. वाळवा) येथे केलेल्या कामगिरीवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील तीन निष्काळजी पोलिसांमुळे पाणी फिरले. सायंकाळी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातून आटपाडकर बेडीसह पसार झाल्याने एकच खळबळ उडाली.पिंपळगाव येथील अमर ऊर्फ संतोष आटपाडकर हा कवठेमहांकाळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. १९ मार्चला कवठेमहांकाळ येथे त्याने कर्नाटकातील मोहम्मद अक्रम पाशा (४०) यांना अडवून धमकी देऊन त्यांच्याकडील आलिशान मोटार लंपास केली होती. याप्रकरणी आटपाडकरचे साथीदार उमेश जालिंदर नरळे व संतोष गोपीनाथ खोत या दोघांना अटक करण्यात आली होती, मात्र आटपाडकर हा पसार झाला होता. तो पेठनाक्यावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली. यानंतर पथकाने शुक्रवारी सकाळी पेठनाका येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. जबरी चोरीचा गुन्हा त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल असल्याने दुपारी आटपाडकर याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.कवठेमहांकाळ येथे आणल्यानंतर तीन पोलिसांनी त्याला बेड्या घालून कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तपासणी झाल्यानंतर सायंकाळी त्याला बाहेर आणण्यात आले. यावेळी सोबत असलेल्या पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून आटपाडकर याने तिन्ही पोलिसांना हिसडा मारून बेडीसह पलायन केले. या पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पसार झाला.‘एलसीबी’चे पथक पुन्हा शोधासाठी!आटपाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, कट रचणे, मारामारी, बेकायदार हत्यार बाळगणे, असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीतील दोन साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो पळाल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पुन्हा त्याच्या तपासासाठी रवाना झाले आहे.
पकडलेला आरोपी दहा तासांत पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 12:18 AM