मिरज : मिरजेतील ॲपेक्स केअर हॉस्पिटलचे डॉ. महेश जाधव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गांधी चौक पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणी डाॅक्टरच्या अटकपूर्व जामिनावर आज, शुक्रवारी सत्र न्यायालयात निर्णय होणार आहे. कोविड साथीदरम्यान जिल्ह्यात प्रथमच डाॅक्टरांवर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रुग्णालयात पुरेशी यंत्रसामग्री नसताना आणि रुग्णांवर उपचार करण्यास बंदी असतानाही उपचार करून भरमसाट बिले आकारल्याप्रकरणी अॅपेक्स केअर रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव याच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल आहे. यापैकी पाचजणांना अटक केली आहे. अॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी उपचारात हलगर्जीपणा करत अनेक रुग्णांच्या मृतास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गांधी चौक पोलिसांनी भरत वेल्लाळ (रा. सांगली), गोकुळ विनायक राठोड (वय २३, रा. सांगली), बाळू ऊर्फ जानकीराम मारुती सावंत (रा. गारपीर चौक, सांगली) व राजेंद्र म्हाळाप्पा ढगे (३४, रा. कलानगर, सांगली) यांना अटक केली. डॉ. महेश जाधव यास न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. प्रसन्न करंजकर व नरेंद्र जाधव या दोन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केले आहे.
रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसतानाही डॉ. जाधव याने अॅपेक्स कोविड रुग्णालय सुरू केले होते. रुग्णांवर औषध उपचार करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथक न ठेवता होमिओपॅथीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रुग्णांवर उपचार केले होते. रुग्णांच्या नातेवाइकांकडून भरमसाट बिलांची आकारणी करून त्यांना बिलांच्या पावत्या देण्यास टाळाटाळ केली होती. याबाबत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याने या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारास प्रतिबंध केले होते. बंदी असतानाही नवीन रुग्ण दाखल करून घेऊन उपचार सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. डाॅ. जाधव याच्या अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी सत्र न्यायालयात निर्णय होणार आहे.