सांगली : हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून-खटल्यात मंगळवारी कृष्णा शिंदे यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली. घटनेदिवशी तीनही आरोपींना हातात चाकू घेऊन पळून जाताना पाहिले, त्यांना मी पकडण्याचाही प्रयत्न केला, असे त्यांनी साक्षीत सांगितले. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
हिवरेतील शिंदे वस्तीवर २१ जून २०१५ रोजी सुनीता पाटील, निशिगंधा शिंदे व प्रभावती शिंदे या तीन महिलांचा गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला होता. गेल्या महिन्यात या तिहेरी खून-खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत पंच, फिर्यादींची साक्ष पूर्ण झाली आहे. सोमवारी व मंगळवारी असे सलग दोन दिवस खटल्याचे काम सुरु राहिले. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, तर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत.
अॅड. निकम यांनी साक्षीदार कृष्णा शिंदे यांची साक्ष नोंदवून घेतली. दि. २१ जून २०१५ रोजी शिंदे वस्तीपासून काही अंतरावर मी कामानिमित्त निघालो होतो. त्याचवेळी तेथून संशयित सुधीर घोरपडे, रवींद्र कदम व अल्पवयीन संशयित असे तिघेजण पळून जात होते. त्यांच्या हातात चाकू होता. त्यांच्या कपड्यावर रक्ताचे डाग दिसल्याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून गेले, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात संशयितांकडून चाकू व कपडे पंच सत्यजित पाटील यांच्यासमक्ष जप्त केले होते. त्यांचीही साक्ष नोंदविण्यात आली.
शिंदे गोंधळलेअॅड. प्रमोद सुतार यांनी कृष्णा शिंदे यांची उलटतपासणी घेतली. यामध्ये त्यांनी, पळून जाताना संशयिताच्या हातात जुना चाकू होता. न्यायालयासमोर सादर केलेला चाकू नवीन आहे?, असा प्रश्न विचारला. यावर शिंदे गोंधळून गेले. त्यांना स्पष्टपणे उत्तर देता आले नाही.