सांगली : कुंडल पोलीस ठाण्यात विनयभंगप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी संशयित पांडुरंग ऊर्फ पांड्या भगवान घाडगे (वय ५५, रा. तुपारी, ता. पलूस) याने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास सांगली येथील न्यायालयाच्या आवारातील एका इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली.या घटनेनंतर तब्बल तासभर त्याच्या नातलगांनी न्यायालयाच्या आवारात थयथयाट करीत पोलिसांना वेठीस धरले. अखेर पोलिसांनी जबरदस्तीने त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. यावेळी नातेवाईक व पोलिसांत झटापटही झाली. पोलिसांनी घाडगे याच्यासह पत्नी यमुनाबाई व मुलगा युवराज यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पांडुरंग घाडगे याच्या विरोधात सांगली जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. यापूर्वीही त्याने अटक टाळण्यासाठी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांवर हल्ले केले आहेत. नुकताच तुपारी वसाहत येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पांडुरंग घाडगेसह तीन संशयितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी पीडित मुलीच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी त्याच्या अटकेचे आश्वासन दिल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी मंगळवारी आंदोलन मागे घेतले.दरम्यान, बुधवारी घाडगे, त्याचा मुलगा युवराज, पत्नी यमुनाबाई व इतर नातलग एका न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीसाठी सांगलीत आले होते. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली.
न्यायालय आवारातील इमारतीवरून आरोपीची उडी
By admin | Published: October 15, 2015 12:18 AM