प्रदीप पोतदार
लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे एकंद : कवठे एकंद (ता. तासगाव) येथील प्रयोगशील शेतकरी महेश महादेव यादव यांनी ऐन उन्हाळ्यात अनुष्का जातीच्या द्राक्षवेलीची डोळे भरणी केली असून, या प्रयोगाला शंभर टक्के यश आले आहे.
योग्य नियोजन, अचूक व्यवस्थापनातून एक एकर बागेच्या डोळे भरणीचा धाडसी निर्णय त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे.
उन्हाळी हंगामात द्राक्षबाग टिकवणे वाढवण्यासाठी शेतकऱ्यासाठी आव्हान बनते. अशा परिस्थितीत द्राक्षवेलीची डोळे भरणी करत नाहीत. उन्हाळ्यात डोळे भरणी यशस्वी होत नाही, अशी यापूर्वीची उदाहरणे आहेत.
मात्र, यादव यांनी जिद्दीने एक एकर क्षेत्रातील द्राक्षांच्या जंगली काडीला अनुष्का जातीच्या द्राक्ष काडीची भरणी २० मार्च रोजी केली होती. अवघ्या महिनाभरात अपेक्षेपेक्षा चांगली जोमदार वाढ झाली आहे.
सूक्ष्म अन्नद्रव्य, खते व औषधांचे योग्य नियोजन, पाणी व्यवस्थापन याच्या माध्यमातून चांगली वाढ झाली असल्याचे यादव यांनी सांगितले. अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. कवठेएकंद येथील फत्तेसिंग गुरव यांनी या बागेतील अचूक डोळे भरणी केली आहे.