सांगली : जिल्ह्यातील महामार्गांच्या दुर्दशेप्रश्नी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच कंत्राटदारांची कानउघाडणी करतानाच सांगली-पेठ, विटा-मिरज आणि मिरजेतील रस्त्यांबाबत त्यांनी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले.सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या रस्ते विकास कामांसाठीची आढावा बैठक संजयकाका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत पार पडली. बैठकीस केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगावकर, महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता देशपांडे आणि इतर अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.
विटा ते मिरज आणि पेठ नाका ते सांगली या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झालेल्या रस्त्यांची ताबडतोब दुरुस्ती करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. मिरज शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबतही पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. असे रस्ते असतील, तर नागरिक सत्ताधारी म्हणून आम्हाला जाब विचारतील. त्यामुळे लोकांसाठी उपयुक्त व दीर्घकाळ टिकणारे चांगले रस्ते करावेत. पावसाळ्यात अडचणी असतील, तर किमान पावसाळा होईपर्यंत चांगली दुरुस्ती तरी करावी, असे आदेशही त्यांनी दिले.निमणी ते आष्टा : राष्टय महामार्गात घ्या!लांडगेवाडी-कवठेमहांकाळ-रांजणी या ४५ कि.मी.च्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश, तसेच औदुंबर तीर्थस्थळाकडील भाविकांच्या वाढत्या संख्येची दखल घेता, राज्य महामार्ग १५१ मधील निमणी ते आष्टा या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात वर्गीकरण करण्याची मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती संजयकाका पाटील यांनी दिली. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग, मनमाड-चिक्कोडी राष्ट्रीय महामार्ग, तसेच रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या सर्व महामार्गांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना सूचना करण्यात आल्याचेही खासदार पाटील म्हणाले.