विटा : एका बैलगाडीतून जास्तीत-जास्त एक ते दीड टन ऊस वाहतूक करणे बंधनकारक असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर केल्याने पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने शनिवारी खानापूर व कडेगाव तालुक्यातील ३५ बैलगाडीचालकांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. बऱ्याच कारखान्यांकडे बैलगाडीने ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस, बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राणीमित्रांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.
त्यामुळे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाच जिल्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बी. बी. देवरे, प्राणी कल्याणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील हवालदार यांच्यासह नऊजणांच्या विशेष पथकाची नेमणूक करून अशा बैलगाडी चालकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या पथकाने पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातून कारवाईचा बडगा हाती घेतला आहे.
पथकाने शुक्रवारी सोनहिरा साखर कारखान्याच्या १६, तर शनिवारी विराज शुगरच्या १९ अशा ३५ बैलगाडीमालकांवर प्राणी क्रूरता अधिनियम १९६० नुसार विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने ऊस वाहतूक करणाºया बैलगाडी मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात ही मोहीम दि. २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.मोहीम तीव्र करू...साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारे बैलगाडी मालक नियमांचे पालन करीत नाहीत. अनेकवेळा आजारी व अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर होतो. वास्तविक एका बैलगाडीतून एक ते दीड टन वाहतुकीचा नियम असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जात आहे. त्यामुळे बैलांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने पाच जिल्ह्यात कारवाईची मोहीम हाती घेतली असून, त्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातून करण्यात आली असून, ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक बी. बी. देवरे यांनी सांगितले.
बैलगाडीमुक्त कारखाने करणार...या कारवाईनंतर पथकाने सोनहिरा व विराज शुगर प्रशासनासमवेत बैठक घेतली. याबाबत बैलगाडी चालकांचे प्रबोधन करण्याबरोबरच बैलांना क्रुरतेची वागणूक देऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे या पथकाने कारखाना व्यवस्थापनाला सांगितले. त्यावेळी त्यांनी पुढील वर्षीचा गळीत हंगाम आम्ही बैलगाडीमुक्त करणार असल्याचे पोलीस पथकाला सांगितले.