सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्यास सुरुवात केली आहे; मात्र या परीक्षेत खरे परीक्षार्थी न बसता इतरच बसून परीक्षा देत असल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यामुळे असे प्रकार कोणीही करु नयेत असे प्रकार करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शिकावू वाहन परवाना काढण्यासाठी पूर्वी वेळ घेऊन परीक्षा द्यावी लागत होती. कोरोना संसर्गामुळे सुलभता येण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे;मात्र यात गैरप्रकार सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वास्तविक शिकाऊ वाहन परवाना मिळविण्यात सुलभता यावी, वेळेची बचत व्हावी यासाठी ऑनलाईन परीक्षा महत्त्वाची असताना त्यातील गैरप्रकार चुकीचे आहेत.
नव्याने सुरु झालेल्या या प्रणालीवर राज्यात १६ हजार ९२० शिकाऊ परवाना तर ४०० वाहनांची नोंदणी झाली आहे. या चांगल्या उपक्रमाचा कोणीही गैरवापर करु नये. तसेच जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफेच्या वतीनेही असे प्रकार होत असल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.