कुपवाड : लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने कुपवाड शहरातील व विस्तारित परिसरातील चार किराणा दुकानदार व दोन चिकन सेंटर चालकांवर कारवाई करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. किराणा दुकाने व इतर व्यवसाय बंद आहेत. तरीही कुपवाड शहरातील व विस्तारित परिसरातील काही किराणा दुकाने, चिकन सेंटर खुलेआम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, तुषार काळेल यांच्यासह कुपवाड पोलिसांच्या पथकांनी शहरात तपासणी केली असता चार किराणा दुकाने व दोन चिकन सेंटरमधून विक्री सुरू असल्याचे आढळून आले.
त्यामुळे बालेचांद इसाक शेख (वय ३८, रा. कानडवाडी रोड, कुपवाड एमआयडीसी), राजेंद्र बापू माने (३८, रा. अहिल्यानगर बाजारपेठ, कुपवाड), संकेत संजय खोत (२१, रा. माधवनगर रोड, कुपवाड), प्रसाद पांडुरंग शिंदे (२०, रा. बामणोली गणेशनगर) हे चार किराणा दुकानदार व मकबूल दिलावर मुजावर (२८, रा. कापसे प्लाॅट, कुपवाड), वलीमहंमद बजलुरअहंमद खान (२८, रा. बामणोली) या दोन चिकन सेंटर मालकासह सहा जणांवर पोलिसांनी कारवाई करुन अटक केली आहे.