इस्लामपूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदारांबरोबर कारखान्याचा करार होतो. यावेळी संबंधीत कंत्राटदारांना ऊस तोडणीचे पैसे रितसर दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना पैस देण्याची गरज नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तोडणीसाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी केले. वाहतूकदार आणि तोडणी मजुरांच्या पैशाबाबत संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, तोडणी कंत्राटदारांनी शेतकऱ्यांकडे पैसे मागितल्याची एकही लेखी तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच उरत नाही. मात्र जर कोणी पैसे मागितल्याची किंवा घेतल्याची लेखी तक्रार दिली, तर निश्चितपणे संबंधीत तोडणी कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. या गळीत हंगामात उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्या तुलनेत तोडणी मजुरांची संख्या कमी आहे. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती असल्याने शेतकरी आपला ऊस लवकर तुटावा यासाठी प्रयत्नशील असतो. त्याच्या या अडचणीचा फायदा काही तोडणी कंत्राटदार, मजूर उचलत आहेत. प्रत्येक हंगामात शेवटच्या टप्प्यात पैसे घेऊनच ऊस तोडला जात असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. मोठे शेतकरी यापद्धतीने आपला ऊस तोडून घेतात. त्यामुळेच तोडणी कंत्राटदार आणि मजूर पैशांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे प्रकार घडत आहेत.
चौकट
शंभर टक्के उसाचे गाळप
माहुली म्हणाले, या गळीत हंगामात संपूर्ण क्षेत्रातील ऊस तुटल्याशिवाय हंगाम बंद होणार नाही. तशी तोडणी व्यवस्था कारखान्याने केली आहे. त्यामुळे ऊस तोडणीसाठी कोणीही शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. पैसे मागितल्याची तक्रार आल्यास कारखाना प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल.