विटा : शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीप्रमाणेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करावे, अन्यथा संबंधित व्यापाऱ्यांवर बाजार समिती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशारा विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा कडेगावचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक अमोल डफळे यांनी दिला.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडा बाजारात शासनाने जाहीर केलेल्या धान्याच्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडून व्यापारी धान्य खरेदी करत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विटा कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक अमोल डफळे यांनी धान्य व्यापारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी तालुका कृषी अधिकारी सी. पी. डुबल, बाजार समितीचे सचिव प्रकाश जाधव उपस्थित होते.यावेळी डफळे यांनी, बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झाली असून शेतकऱ्यांचे हित हेच बाजार समितीची प्रगती असल्याने व्यापारी वर्गाने शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास बाजार समिती कायद्यानुसार संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती तातडीने द्यावी, असे आवाहनही केले.बाजार समितीचे सचिव प्रकाश जाधव यांनी शेतकरी हा त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून शेतीमाल बाजार समितीत घेऊन येतो. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी शेतीमाल खरेदी करू नये अशी सूचना केली. या बैठकीत व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. राज्य शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीप्रमाणेच धान्य खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही दिली. (वार्ताहर)‘त्या’ व्यापाऱ्यांची माहिती त्वरित द्यावीअमोल डफळे यांनी, बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झाली असून शेतकऱ्यांचे हित हेच बाजार समितीची प्रगती असल्याने व्यापारी वर्गाने शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास बाजार समिती कायद्यानुसार संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती तातडीने द्यावी, असे आवाहनही केले.
धान्य खरेदी कमी दरात करणाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: December 05, 2014 10:14 PM