मिरज : महसूल विभागाशी निगडीत कामांसाठी ग्रामीण जनतेची अडवणूक झाल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा. संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मिरजेचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी सोमवारी दिले.
महसूल विभागाशी संबंधित कामांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या उपस्थितीत सभापती खवाटे, उपसभापती आमटवणे व गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी बैठक घडवून आणली. ओढा पात्रातील व गायरान जमिनीवरील अतिक्रमणे, पाणंद रस्त्यांची समस्या, सातबारा उताऱ्यातील त्रुटी यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अतिक्रमणाचा विषय सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी उपस्थित केला.
मंडल अधिकारी व तलाठ्यांकडून नोंदीसह महसूल संदर्भातील कामासाठी अडवणूक होत असल्याने ग्रामीण नागरिक नाराज आहेत. अशा वादग्रस्त मंडल अधिकारी, तलाठ्यांवर कारवाईची मागणी विक्रम पाटील यांनी केली. याची तहसीलदारांनी गांभीर्याने दखल घेतली. महामार्गाच्या कामामुळे पाणी योजनेच्या जलवाहिन्यांचे नुकसान झाले आहे. दिलीप बिल्डकाॅनच्या क्रशरमुळे द्राक्ष बागांच्या झालेल्या नुकसान भरपाईची रंगराव जाधव यांनी मागणी केली. हा विषय उपसभापती आमटवणे यांनी लावून धरला. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. मिसाळ यांनी रस्ता सूचीबाबत मार्गदर्शन केले. रस्त्यांच्या सर्वेक्षणाची मागणी अशोक मोहिते यांनी केली.
बैठकीस गटविकास अधिकारी सरगर, सहायक गटविकास अधिकारी अशोक बागर उपस्थित होते.
चौकट
रस्ता अडविल्यास. गुन्हे दाखल करा : कुंभार
मालगाव येथील शेतकऱ्याने रस्ता अडवून ग्रामस्थांची अडवणूक केल्याची तक्रार काकासाहेब धामणे यांनी केली. अडविलेले रस्ते ज्या त्या विभागाने खुले करावेत, अडथळे आणणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी दिले.