सांगली : कॅफेमधील गैरप्रकाराबाबत पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी गांभीर्याने दखल घेत निवेदनावर तातडीने कारवाई करा, असा शेरा मारून राज्यातील कॅफेची तपासणी करावी. बेकायदेशीर कॅफेवर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली.सांगलीत कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर उद्रेक झाला. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला. जिल्हाधिकारी यांनी कॅफेबाबत नियमावली जाहीर करून पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. महापालिका आयुक्तांनीदेखील कॅफेची तपासणी करण्याचे आदेश दिले. नोटिसा बजावल्या. सांगलीतील कॅफेतील कंपार्टमेंट पद्धत बंद झाली. परंतु कॅफे मालकांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर अद्याप कारवाई झाली नाही, अशी माहिती नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.ते म्हणाले, नुकतेच गडहिंग्लज येथे कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत. त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतरही राज्यात बेकायदा कॅफे सुरू राहिले तर आमच्या ‘स्टाईल’ने उत्तर दिले जातील.
गडकोटांवरील अतिक्रमणाला विरोधविशाळगडावरील आंदोलनाचे आम्ही समर्थन करतो. महाराष्ट्रात अनेक गडकोटावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. या विरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक राहील, असे चौगुले यांनी सांगितले.