सांगली : शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बुधवारी दिवसभरात तीनही शहरांत ५५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करीत सात हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातही प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहे. त्यानुसार शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिक, वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यक्षेत्रात बुधवारपासून ही मोहीम सुरू झाली. सहायक आयुक्त सहदेव कावडे, एस. एस. खरात, दत्तात्रय गायकवाड आणि दिलीप घोरपडे व सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली आहे. सांगलीत राजवाडा चौकात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, वैभव कुदळे, किशोर कांबळे, प्रणिल माने यांच्यासह प्रभाग समिती एकच्या कर्मचाऱ्यांनी विनामास्क वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. दिवसभरात सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात ५५ व्यक्तीवर कारवाई करत ७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वानी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.
चौकट
प्रभागनिहाय आकडेवारी
प्रभाग समिती कारवाई
एक १३
दोन ०७
तीन २५
चार १०
फोटो : १७ शीतल ०१