सांगली : सांगली-पेठ व सांगली-कोल्हापूर रस्त्यांच्या दुरवस्थेवरून गुरुवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जनतेची अडचण ओळखून जर रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण केली नाही, तर त्याची फळे भोगावी लागतील, असे सांगत, येत्या पंधरा दिवसांत वाहतुकीस योग्य रस्ता करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराच जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाºयांना दिला.‘लोकमत’ने गेले काही दिवस महामार्गांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. नागरिक जागृती मंचसह विविध संघटनांनी यासंदर्भात पाठपुरावाही सुरू केला आहे. त्यामुळे सांगली-पेठ, सांगली-कोल्हापूर या खराब रस्त्यांच्या प्रश्नावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम व महापालिकेच्या अधिकाºयांची संयुक्त बैठक झाली. यात या दोन रस्त्यांसह जिल्ह्यातील इतर मार्गांचाही आढावा घेण्यात आला.बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी काळम-पाटील म्हणाले की, गेल्या पंधरवड्यापासून रस्त्याची दुरवस्था व त्यामुळे नागरिकांना सहन कराव्या लागणाºया यातना याबाबत वर्तमानपत्रातून वाचत आहे. जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख या नात्याने जनतेची अडचण ओळखून त्या सोडविणे आवश्यक असल्यानेच बैठक होत आहे. रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण केली नाहीत, तर त्याची फळे अधिकाऱ्यांना भोगावी लागतील. प्रसंगी मुख्यमंत्र्यांपर्यंत रस्त्यांचा प्रश्न पोहोचविणार आहे.नागरी जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले की, दोन्ही मार्ग वाहतुकीस योग्य राहिले नाहीत. दररोज अपघात होत असतानाही दुरूस्ती होत नाही. बांधकाम विभागाकडून रस्ता राष्टय महामार्ग झाला तरीही अवस्था तीच राहिल्याने, रस्ता दुरूस्त करायचा होत नसल्यास वाहतूक बंद करून टाकावी.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले म्हणाले की, तुंग ते सांगली हा रस्ता कधीही चांगला नाही. यावर दररोज अपघात होत आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरूस्ती व्हावी. व्यापारी संघटनेचे अतुल शहा म्हणाले की, गेल्यावर्षी दिवाळीत खड्ड्यांमध्ये दिवे लावून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. आता या गोष्टीला एक वर्ष होत आले तरीही रस्त्यांचा प्रश्न कायम आहे.शीतल थोटे म्हणाले की, खराब रस्त्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. ओव्हरलोडला दंड करता, मग खराब रस्त्यांमुळे टायर तसेच अन्य गोष्टींच्या होणाºया नुकसानीस कोणाला जबाबदार धरायचे? माणसांच्या जिवाला कोणतीच किंमत नसल्याचेच अधिकाऱ्यांना वाटत आहे.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केली. सार्वजनिक बांधकामकडून राष्टय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ता हस्तांतरित होऊन वर्ष झाले, तरी अजून दुरूस्ती होत नसल्याने हलगर्जीपणाबद्दल जबाबदार धरून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, स्वाभिमानीचे महेश खराडे, असिफ बावा, महेश पाटील, अमर पडळकर, उमेश देशमुख, अमर निंबाळकर, अतुल पाटील, रामदास कोळी, उत्तम मोहिते यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सांगली-पेठ रस्ता किती दिवसात दुरुस्त करणार?सांगली-पेठ रस्ता किती दिवसात दुरूस्त करणार? असा सवाल जिल्हाधिकाºयांनी अधिकाºयांना केला. यावर नोव्हेंबरपर्यंत करू, असे सांगताच, नोव्हेंबर नको, येत्या पंधरा दिवसात पूर्ण करा, असे आदेश त्यांनी दिले. रस्त्यांची दुरूस्ती करताना मुरूम न वापरता चांगल्या दर्जाचे साहित्य वापरावे. कुठेही मुरूम वापरत असल्यास काम बंद करावे, असेही त्यांनी सांगितले.‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यशमहामार्गांमुळे होणारे वाहनधारक, नागरिकांचे हाल, प्रशासकीय तसेच राजकीय पातळीवरील उदासीनता या सर्व गोष्टींवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. सातत्याने त्याचा पाठपुरावाही केला. या पाठपुराव्याला आता यश आले आहे. जिल्हाधिकाºयांनी रस्ते दुरुस्तीसंदर्भात आदेश देताना, हलगर्जीपणा झाल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे....तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा!सांगली - पेठ रस्त्याच्या बाजूला गटारी नसल्याने रस्ता वेगाने खचत असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. यावर, सरकारी जागेत गटार काढण्यास कोणीही अडवणूक करत असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.