बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार, २५ एप्रिलच्या बैठकीत होणार निर्णय
By अविनाश कोळी | Published: April 23, 2024 04:14 PM2024-04-23T16:14:28+5:302024-04-23T16:16:12+5:30
महाविकास आघाडीत मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्याची मागणी होती
सांगली : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सांगली लोकसभेची जागा उद्धवसेनेला मिळाली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा, अशा सूचना त्यांना काँग्रेसकडून देण्यात आल्या. मात्र, सोमवारी विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतलेल नाही. त्यामुळे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यावर दि. २५ एप्रिल रोजी कारवाई होणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली. काँग्रेसच्या या बैठकीमध्ये विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्याची मागणी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला नाही, म्हणून काँग्रेसकडून त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होऊ शकते, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले.