सांगली : सांगली आणि विटा येथील दोन टोळ्यांमधील दहा गुंडांना गुरुवारी तडीपार करण्यात आले. सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर या चार जिल्ह्यांतून एक वर्षासाठी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी तडीपारीचा आदेश बजावला.
सांगलीतील टोळीमध्ये स्वप्नील नंदकुमार कोळी (वय २३, रा. माळी दूध संकलन केंद्राजवळ), जावेद अब्दुलवाहीद नदाफ (२१, रामनगर, कोल्हापूर रस्ता), परशुराम ऊर्फ पिंटू नामदेव गोडबोले (३०, चांदणी चौक), जावेद रफीक जानकर (२१, रामनगर, कोल्हापूर रस्ता), गौरव अनिल यादव (२७, नेमिनाथनगर, सांगली) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, बेकायदा जमाव जमवून दहशत माजविणे, दंगा करणे, बेकायदा हत्यार बाळगणे, शासकीय नियमांचे उल्लंघन करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१६ पासून ही टोळी सक्रिय होती. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी या टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढून तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
विट्यातील टोळीमध्ये सोमनाथ भानुदास जाधव (२४), गणेश चंद्रकांत माने (२१), संदीप हणमंत शिरतोडे (१९), सुहास संजय मदने (१९) व प्रकाश नामदेव शिरतोडे (२५, सर्व रा. आळसंद, ता. खानापूर) यांचा समावेश आहे. २०१७ पासून ही टोळी सक्रिय आहे. विहिरीतील पाण्याची इलेक्ट्रीक मोटर लंपास करणे, मोटरीच्या पाईप कापून लंपास करणे, केबलची चोरी, असे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी टोळीविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. याशिवाय, अन्य काही गुंडाचाही पोलीस शोध घेत असल्याचे पोलीसांनी सांगितले.