सहकारतपस्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांची सहकार, राजकारण आणि समाजकारण यामधली कामगिरी उत्तुंग अशीच होती. सांगलीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पताका त्याकाळी फडकलेली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील (बाबा) हे आज राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी बजावताना दिसतात. सामाजिक भान असलेला हा नेता आहे, विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झाले असले तरी, त्यांनी लगेचच सुरू केलेल्या कामामुळे तेच लोकप्रतिनिधी आहेत, अशी भावना सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे. लोकांच्या मनामध्ये ते चांगलेच रुजले आहेत.
गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा पाईक म्हणून काम करण्याचा विडा उचलत त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. त्यात त्यांनी कुठेच खंड पडू दिला नाही. गुलाबराव पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते, तीच प्रतिमा पृथ्वीराज पाटील यांनीसुद्धा आपल्या कृतिशील कामातून जोपासली आहे. काँग्रेस पक्ष खडतर परिस्थितीतून जात असतानासुद्धा त्याच्या मजबूत बांधणीसाठी आणि निष्ठावंत तसेच धडपडणारा कार्यकर्ता घडवण्यासाठी गेल्या काही वर्षांत त्यांनी खूप काही प्रयत्न केले आहेत.
गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली या संस्थेच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांनी मिरज येथे गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल उभे केले आहे. याठिकाणी आठ महाविद्यालये, दोन केंब्रिज स्कूल्स, मुलींचे वसतिगृह अशा शैक्षणिक सुविधा उभ्या केल्या आहेत. असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ऑफ महाराष्ट्र या संस्थेवर ते सेक्रेटरी म्हणून काम करतात. नॅशनल फेडरेशन ऑफ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नवी दिल्ली या ठिकाणीही ते खजिनदार म्हणून काम करीत आहेत. सांगली जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. याशिवाय सिम्बॉयसिस को-ऑपरेटिव्ह फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि गुलाबराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचेही अध्यक्ष आहेत. याशिवाय विविध संस्था आणि सामाजिक संस्थांवरही ते काम करीत आहेत.
कृष्णा नदीला आलेल्या २०१९ च्या भयंकर महापुरावेळी सरकारी यंत्रणा सांगली शहरात आणि भागात हतबल होत चाललेली असताना, पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन महापुरात धडक काम सुरू केले. लोकांना पुरातून बाहेर काढणे, त्यांना मदत करणे, औषधे, जेवण पुरवणे अशी विविध समाजोपयोगी कामे त्यांनी केली. महापुराच्या काळात ते अखंडपणे लोकांसाठी कार्यरत होते. तिथेच लोकांना त्यांच्या कामाची खरी किंमत कळाली.
गेले दहा महिने कोरोना व्हायरसने सगळीकडे थैमान घातलेले आहे. या भयंकर आजारामुळे लोक हैराण झाले होते. रुग्णांची संख्या सतत वाढत चालली होती. प्रशासन आपल्यापरीने काम करीत होते, त्यांना मदत म्हणून गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने पृथ्वीराज पाटील यांनी ‘कोरोना योद्धा’ म्हणून आपण स्वतः आणि आपल्या टीमला या कामात वाहून घेतले.
२०१४ मध्ये सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी पृथ्वीराज पाटील यांच्यावर येऊन पडली. त्यावेळी महाराष्ट्रात तसेच देशात काँग्रेसची सत्ता नव्हती. अशा अडचणीच्या काळात त्यांच्यावर या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आली. जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार नव्हता, तसेच सांगलीतही काँग्रेसचा आमदार नव्हता. अशावेळी काम कसे करायचे, याचे एक मोठे आव्हान होते. अनेक कार्यकर्ते सत्तेच्या मोहापायी पक्ष सोडून सत्ताधार्यांच्या मागे जाऊ लागले होते. तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही. जे काही कार्यकर्ते बरोबर आहेत, त्यांना घेऊन पक्षाचे काम सुरू केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयांना, अन्यायी धोरणांना विरोध करत त्यांनी मोर्चे काढले, निदर्शने केली, अनेकवेळा आंदोलने केली. एका वर्षात ७० हून अधिक वेळा त्यांनी आंदोलने केली. काँग्रेस पक्ष जिवंत आहे, तो संपलेला नाही, तो जनतेच्या हिताची कामे करतो, हेही त्यांनी दाखवून दिले.
गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने मिरज येथे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, गुलाबराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, सीबीएससी स्कूल, प्रमिलादेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस, इंग्रजी माध्यमाचे डी.एड्. कॉलेज, बी.एड्. कॉलेज, एम.एड् कॉलेज, मुलींचे वसतिगृह, हॉस्पिटल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्था त्यांनी उत्तमप्रकारे चालवल्या आहेत. सिम्बॉयसिस को-ऑपरेटिव्ह फार्मास्युटिकल हा सहकार तत्त्वावरील जिल्ह्यातील पहिला औषध निर्मितीचा प्रकल्प त्यांनी उभा केला आहे. म्हाडाच्या माध्यमातून शेकडो झोपडपट्टीवासीयांना निवारा देण्याची व्यवस्था केली आहे. सायकलिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंची निर्मिती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
राजकीय क्षेत्रात राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रात सत्तेमध्ये काँग्रेस सहभागी आहे. त्यामुळे ते विकास कामे खेचून आणत आहेत. गेली तीस वर्षे ते सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत आहेत. सांगलीचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाही आहेत.
फाेटाे : पृथ्वीराज पाटील यांचा वापरणे
तीन काॅलम १० सेमी वापरणे