मिरज : महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर रुजू झालेल्या दत्तात्रय लांघी यांच्याकडे सांगली वगळून मिरज व कुपवाड शहराचा कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, मिरज व कुपवाड शहरातील समस्या व कामकाजाचा निपटारा जलद होण्यासाठी नियुक्त केलेल्या अतिरिक्त आयुक्तांना आर्थिक व आस्थापनेचे अधिकार देण्यात आले नसल्याने व स्वतंत्र निर्णय घेता येणार नसल्याने हे पद केवळ शोभेचे ठरणार आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्त हे पद गेली दहा वर्षे रिक्त होते. लांघी यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर मिरज व कुपवाड शहरातील समस्या व कामकाजाचा निपटारा जलद होण्यासाठी दत्तात्रय लांघी यांना आयुक्तांच्या नियंत्रणात समिती तीन, चारचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती व प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार, महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी नियुक्त केल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी याबाबत आदेशात म्हटले आहे. महापालिका मिरज विभागीय कार्यालयात बैठक व्यवस्था असलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे मिरज व कुपवाड विभागातील सर्व खातेप्रमुख, कार्यालयीन प्रमुख, विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांनी त्यांच्याकडील कामकाज अतिरिक्त आयुक्त यांच्यामार्फत आयुक्तांकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या मिरज व कुपवाड येथील कामे प्रशासकीय मान्यतेसाठी सहाय्यक आयुक्त व उपायुक्तांमार्फत आयुक्तांकडे सादर होतात. आता मिरज व कुपवाडसाठी वरिष्ठ अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती झाली तरी त्यांना आर्थिक व आस्थापनेचे स्वतंत्र अधिकार देण्यात आले नाहीत. यामुळे मिरज व कुपवाड येथील कामांचा जलद निपटारा होण्याऐवजी आता अतिरिक्त आयुक्तांमार्फत प्रस्ताव आयुक्तांकडे जाणार असल्याने कामांना अधिक विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिरज व कुपवाड शहरातील समस्यांबाबत अतिरिक्त आयुक्तांना निर्णयाचे अधिकार नसल्याने हे पद शोभेचे ठरणार असल्याची चर्चा होत आहे.