मिरज : आषाढी वारीसाठी तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा मध्य रेल्वेतर्फे मिरज ते पंढरपूर वारी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोरोना साथीमुळे गेली दोन वर्षे आषाढीवारी स्थगित होती. यंदा वारकऱ्यांसाठी तीन पॅसेंजर गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याने वारकऱ्यांना रेल्वेने पंढरीची वारी करता येणार आहे. दि. ५ ते १४ जुलैपर्यंत मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी या गाड्याही धावणार आहेत.दोन वर्षांनंतर आषाढी यात्रा यंदा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी सोलापूर व पुणे रेल्वे विभागाकडून वारीसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांना जनरल तिकीट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना साध्या तिकिटावर पंढरपूरला जाता येणार आहे.गेली दोन वर्षे बंद असलेल्या मिरज-बेळगाव, मिरज लोंढा या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वेच्या हुबळी विभागाने घेतला आहे. जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात मिरज-लोंढा, मिरज-बेळगाव, बेळगाव-मिरज, लोंढा-मिरज या पॅसेंजर गाड्या धावणार आहेत. वारीसाठी या गाड्या सुरू होणार असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटकातील वारकऱ्यांना आषाढी वारीसाठी विठ्ठल दर्शनासाठी जाता येणार आहे. मिरज-लोंढा, मिरज-बेळगाव व बेळगाव-मिरज पॅसेंजर जुलै महिन्यात सुरू होत आहेत.
मिरज-पंढरपूर मार्गावर 'वारी'साठी जादा 'रेल्वे गाड्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 3:32 PM