सांगली : पवित्र रमजान महिन्यास बुधवारपासून परंपरेप्रमाणे सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने व पोलिसांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मुस्लिमबांधवांनी मशिदीत नमाजपठण न करता घरीच नमाज अदा केली.
बुधवारी पहिला रोजा होता. त्यामुळे उत्साहात, धार्मिक वातावरणात रमजान सणास सुरुवात झाली. मशिदीत एकत्र नमाजपठण न करता घरीच नमाजपठण करून कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. मुस्लिम धर्मियांमध्ये हा सण सर्वात पवित्र मानला जातो. या सणाला मोठे महत्त्व आहे. अल्लाहप्रती आस्था ठेवत गोरगरिबांना मदत, समाजाप्रती योगदान देण्याची परंपरा या सणाने दिली आहे. संपूर्ण महिनाभर उपवास ठेवतानाच चांगले विचार व आचार जपण्याचे काम केले जाते. सांगली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात हा सण साजरा होत असतो, मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अडचणी येत आहेत. तरीही रमजानची ही परंपरा हे बांध तोडत, नियमांचे पालन करीत जपली जात आहे.
सांगलीतील रमजानला धार्मिक सलोख्याची परंपरा जोडली गेली आहे. रमजान ईददिवशी सर्वधर्मिय एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत असतात. या काळात इफ्तार पार्टीच्या माध्यमातूनही हा सलोखा जपण्यात येतो. त्यामुळेच सांगली जिल्ह्यातील ही परंपरा आदर्शवत मानली जाते.
कोट
जिल्ह्यातील अनेक मुस्लिम बांधवांनी कोरोनाचे हे संकट दूर व्हावे म्हणून अल्लाहकडे प्रार्थना केली आहे. सध्या कोरोनामुळे अडचणी येत असल्या, तरी या काळात धार्मिक नियम पाळताना कोरोना काळातील सामाजिक नियम पाळण्यातही मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत रमजानच्या उपवासांना सुरुवात केली आहे.
- मुन्ना कुरणे, अध्यक्ष, जिल्हा मुस्लिम समाज