सांगली : तासगाव येथील श्री. गणपती पंचायतन देवस्थानच्या रथोत्सवात सहभागी होण्यावरून श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. त्यावर कोल्हापूर येथील धर्मादाय सहआयुक्त यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानुसार अदिती पटवर्धन यांना यंदाच्या रथोत्सवात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.श्री. गणपती पंचायतन देवस्थानच्या तासगाव येथील रथोत्सवापूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यानंतर देवस्थान न्यासाचे महाप्रबंधक पवनसिंह कुडमल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. संबंधित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली होती. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला. तसेच, हल्लेखोरांना आतापर्यंत अटक केली नसल्याने आमच्या सुरक्षेला धोका आहे. जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होणार नाही. तोपर्यंत अदिती पटवर्धन यांना रथोत्सवात सहभागी होण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पटवर्धन यांनी केली होती. त्यावर सांगली येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे वडील राजेंद्र पटवर्धन विरुद्ध मुलगी अदिती पटवर्धन या वादावर सुनावणी सुरू आहे.दरम्यान, कोल्हापूर येथील धर्मादाय सहआयुक्त यांच्याकडे सुनावणी झाली. त्यावर यावर्षीच्या रथोत्सवात अदिती पटवर्धन यांना सहभागी करून घ्यावे. तसेच, याठिकाणी कोणताही वाद निर्माण होऊ नये. यासाठी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सांगली पोलिस आयुक्त कार्यालयाने घ्यावी, असे आदेश धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी नुकतेच दिले आहेत.
एकविसाव्या शतकात महिला सबलीकरण व स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून रथोत्सवात मला सहभागी होण्यास परवानगी देणारा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोल्हापूर येथील धर्मादाय सहआयुक्त यांनी दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करते. - अदिती राजेंद्र पटवर्धन
देवस्थानच्या न्यासाचे महाप्रबंधक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. अगोदर त्यांना अटक करावी, ही आमची मागणी आहे. - राजेंद्र परशुराम पटवर्धन