इस्लामपूर : मालवण येथे प्रशासनाने आम्हाला दिलेल्या वेळेत आम्ही आलो होतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेली वेळ पाळली नाही. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. आम्ही मनात आणले असते, तर आदित्य ठाकरे यांची पळताभुई केली असती. मात्र जयंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याने ठाकरे येथून जाऊ शकले, असे मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.इस्लामपूर दौऱ्यावर गुरुवारी आलेल्या राणे यांनी मालवणच्या समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे, ही दुर्दैवी घटना आहे. अशावेळी राजकारण न करता सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन पुतळा उभारणीच्या कामात योगदान द्यायला हवे, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आपटेला तो जिथे सापडेल तिथे आपटणारचराणे म्हणाले, सुषमा अंधारे यांच्याविषयी काय बोलावे. त्या पद मिळविण्यासाठी बोलतात. संजय राऊत यांना तर आमच्यावर बोलण्याचा पगार मिळतो. त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत अनास्था दाखवणाऱ्या आपटेला तो जिथे सापडेल तिथे आपटणारच. मालवण घटनेचे महाविकास आघाडीला राजकारण करावयाचे आहे. त्यामुळेच ते आले होते. विशाळगड, हडपसर या ठिकाणी ज्या घटना घडल्या, त्यावेळी महाविकास आघाडी कोठे गेली होती, असा प्रश्न. राणे यांनी उपस्थित केला.
नाव न घेता आदित्य ठाकरेंवर बोचरी टीकात्यांनी धर्मांतर केले आहे का हे तपासावे लागेल. तसे असेल तर, त्यांना गोल टोपी घालून मोकळे करावे लागेल. ते हिंदू धर्मांत राहण्याच्या लायकीचे नाहीत, अशी बोचरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी युवानेते आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली.
राणे-हारुगडे यांच्यात बाचाबाची..!इस्लामपूर शहरात गुरुवारी झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या सभेसाठी नितेश राणे हे आले होते. शासकीय विश्रामगृह येथे थांबलेल्या राणे यांना सभेपूर्वी पोलिस निरीक्षक संजय हारुगडे हे नोटीस बजावण्यासाठी गेले. त्यावेळी राणे यांनी नोटीस घेण्यासाठी नकार दिला. तसेच, एकेरी भाषेत बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे हारुगडे हेसुद्धा संतप्त झाले. त्यांनी सभेच्या आयोजकांनाही दोन शब्द सुनावले. यावेळी राणे व हारुगडे यांच्यामध्ये बाचाबाची झाली.