माधवनगरमध्ये औषध फवारणीची मागणी
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील गटारींची अवस्था बिकट आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. गटारींची नियमितपणे स्वच्छता करावी, तसेच डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी नागरिकांतून मागणी आहे. याकडे ग्रामपंचायतीचे प्रशासन लक्ष देणार आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सांगलीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले
सांगली : सांगली शहर आणि उपनगरांमध्ये भुरट्या चोऱ्यांत वाढ झाली आहे. पितळी, तांब्याची भांडी तसेच लोखंडी साहित्य चोरीस जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. माळबंगाला येथील महापालिकेच्या साहित्याचीही चोरी होत आहे. पण, याकडे प्रशासनाचे लक्ष दिसत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाहनांचे लोखंडी भागही चोरीला जात आहेत. पोलीस व ग्रामस्थांनी मिळून रात्रीची गस्त घालावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
सांगलीतील बायपास रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
सांगली : येथील इस्लामपूरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर हॉटेल चालक कचरा रस्त्याकडेला टाकत आहेत. कचरा कोंडाळे नसल्याने रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. या ठिकाणी कचरा कुंडीची सोय करावी, अशी मागणी होत आहे.