जत : शहरात तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीने त्यासाठी २६ जानेवारीचा मुहूर्तही साधला होता; पण जत पोलिसांच्या नोटीसीने आता या कार्यक्रमाला खोडा घातला आहे. पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या मगच पुतळा उभारा, असा आदेश पोलीस प्रशासनाने नोटीसद्वारे दिला आहे.
जतमधील शिवाजी चाैकात शिवाजी महाराज यांचा बंदिस्त पुतळा होता. एका अपघातावेळी येथील बांधकामास धक्का बसल्याने पुतळा हटविण्यात आला होता. यानंतर तब्बल १६ वर्षे हा पुतळा बसविण्याची प्रतीक्षा होती. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तयार आहे. पुतळा उभा करण्यासाठी १६ लाख रुपये खर्चून २०१५ मध्ये चबुतराही बांधला आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या मगच पुतळा बसवा, असा पवित्रा जत पोलीस प्रशासनाने घेतला आहे. याच मुद्द्यावरून आता जत शहरात राजकारणही तापणार आहे.
जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीने लोकवर्गणी जमा केली आहे. मिरज येथील मूर्तिकार गजानन सरगर यांनी हा पुतळा साकारला आहे.
सध्या पुतळा तयार आहे. हा तयार झालेला पुतळा २५ जानेवारीला जतमध्ये आणायचा आणि २६ जानेवारीला जत शहरातून पुतळ्याची भव्य मिरवणूक काढून शिवाजी चौकात उभारण्याचे नियोजन समितीने केले होतो. मिरजेहून पुतळा आणण्याचे नियोजन सुरू झाल्यानंतर जत पोलीस निरीक्षकांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर नोटीस काढत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर पुतळा बसवावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुर्वीचाच पुतळा
नोटिशीनंतर तहसीलदारांच्या दालनात समिती व प्रशासन यांची शुक्रवारी बैठक झाली. सध्या तयार असलेला पुतळा हा ज्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे तेथे १९६७ साली पुतळा होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. पण प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणा मगच पुतळा बसवा, असा पवित्रा घेत परवानगीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.