शीतल पाटील ।सांगली : स्वच्छ भारत स्पर्धेत क्रमांक मिळविण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. दिवस-रात्र स्वच्छतेचे काम जोमाने सुरू आहे; पण स्वच्छता अभियानापासून पदाधिकारी व नगरसेवक अजूनही दूरच आहेत. बहुतांश नगरसेवकांनी या अभियानाकडे तोंडदेखलेपणा केला आहे. तरीही अधिकारी व कर्मचाºयांनी स्पर्धेत वरचा क्रमांक मिळावा म्हणून शिवधनुष्य उचलले आहे.
स्वच्छ भारत स्पर्धेत गेल्यावर्षी सांगली महापालिकेचा देशात १०६ वा क्रमांक होता. तत्पूर्वीच्या दोन वर्षात हाच क्रमांक १०० च्या आत होता. पण गेल्यावर्षी फारसे काम झाले नाही. आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार हाती घेतल्यानंतर स्वच्छता सर्वेक्षणाबाबत अधिकाºयांना सूचना केल्या. त्यात महापुराचा मोठा फटका सांगली व मिरजेला बसला. या महापुरातून सावरण्यातच महापालिकेला दोन ते तीन महिन्यांचा कालावधी गेला.आता दीड महिन्यापासून संपूर्ण प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणावर विशेष लक्ष दिले आहे. उपायुक्त स्मृती पाटील व आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. यंदा देशातील ५० शहरांत सांगलीचा समावेश असावा, असे उद्दिष्ट ठेवून आयुक्त कापडणीस यांनी मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेचे हजार ते बाराशे कर्मचारी व अधिका-यांचे दिवस-रात्र स्वच्छतेच्या कामासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिन्याभरात महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यात आली. शौचालयाच्या रंगरंगोटीपासून ते नळापर्यंत सारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापैकी ३१ शौचालयात वॉशबेसिन, आरसा अशा सुविधाही दिल्या आहेत. झोपडपट्टीचा परिसर हा सर्वात अस्वच्छ असतो. प्रशासनाने या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित केले. अंबाजी माळी, चिंतामणीनगर व गावभागातील झोपडपट्टीची रंगरंगोटी करून हा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे झोपडपट्टीचे रुपडे पालटले आहे. शहरातील चौक, रस्त्यांच्या सुशोभिकरणाचे कामही सुरू आहे. दोन रस्त्यांच्या मधल्या परिसरात असलेला कचरा, झाडेझुडपे काढली जात आहेत.
महापालिका क्षेत्रात ६१ रिक्षा घंटागाडीद्वारे कचरा उठाव सुरू आहे. समडोळी व बेडग रस्त्यावरील कचरा डेपोवर कचºयाचे विघटन करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. प्लास्टिक सेडरही बसवून प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावली जात आहे. जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, शाळा, सार्वजनिक इमारतींच्या भिंतीही रंगल्या आहेत. चौका-चौकात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जागृतीचे फलकही झळकत आहेत.
- संस्थांचा : सहभागही कमी
प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमेसाठी जीवतोड मेहनत केली जात असताना, या अभियानापासून पदाधिकारी व नगरसेवक मात्र चारहात दूरच असल्याचे जाणवते. काही मोजक्याच नगरसेवकांनी मात्र या मोहिमेत आपला सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग कमीच दिसून येतो. निर्धार फौंडेशनसारख्या संघटनेने मात्र स्वच्छता मोहिमेत सातत्य राखले आहे. इतर सामाजिक संघटना लांबच आहेत. तरीही प्रशासनाने सफाई कर्मचारी व अधिकाºयांच्या जिवावर स्वच्छ सर्वेक्षणाचे शिवधनुष्य पेलण्याचा विडा उचलला आहे.
यंदा महापुरामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरूवात करण्यास विलंब झाला. तरीही गेल्या दीड महिन्यात अधिकारी, सफाई कर्मचाºयांनी जीवतोड मेहनत करून शहराला स्वच्छ करण्याची शिकस्त चालविली आहे. यंदा विलंब झाला असला तरी, पुढीलवर्षीच्या अभियानाची तयारी आम्ही आतापासूनच करणार आहोत. - स्मृती पाटील, उपायुक्त
हापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरसेवक व नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षणाबाबत नियोजन करून, महापालिकेचा देशातील ५० शहरांत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.- संगीता खोत, महापौरसांगली महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची जोरदार तयारी चालवली असून, शहरातील भिंती स्वच्छता संदेशाने रंगल्या आहेत.