सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाण्याचा साठा केला आहे. त्याकडे सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि जलसंपदाचे कार्यकारी अभियंता पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. या अधिकाऱ्यांची भूमिका कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांना महापूर येण्याच्यादृष्टीने आहे. म्हणून त्यांना नोटिसा दिल्या असून, भविष्यात त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील व सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी शनिवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत दिली.सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता म्हणाले, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश या संघटनांतर्फे ॲड. ओंकार वांगीकर यांनी ही नोटीस दिली आहे. जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाला महापुराच्या संकटाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कायदेशीर नोटीस दिली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वारंवार पत्रे, सूचना पत्रे, इशारा पत्रे दिली आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना कर्नाटकातील जलसंपदा विभागाबरोबर व प्रशासनाबरोबर समन्वय ठेवा, अशी सूचना दिली होती. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाण्याची पातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठेवली जात आहे की नाही, याकडे बारकाईने लक्ष ठेवा. तसे आढळले नाही तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरण्याची सूचना मुख्यमंत्री शिदे यांनी दिली होती. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन, कार्यकारी अभियंता यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यात पाणीसाठा नियमबाह्यरीत्या वाढतच आहे. पावसाचे प्रमाण यापुढे वाढत जाणार आहे. साहजिकच कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, राधानगरीसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्गही वाढवावा लागणार आहे. त्यामुळे महापुराचा सांगली व कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना फटका बसणार आहे. म्हणून कोल्हापूर, सांगली जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नोटिसा बजावल्या आहेत. यातूनही त्यांनी महापूर रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर त्यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.
१५ ऑगस्टपर्यंत कसोटीचा काळकृष्णा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आता पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. १५ जुलै ते १५ ऑगस्ट हा अत्यंत कसोटीचा काळ आहे. आतापासूनच जिल्हा प्रशासनाने, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकारी अभियंत्यांनी याबाबत तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे, अशी मागणी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.