सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालकांना मुदतवाढ देऊ नये. त्यांची मुदत संपून एक वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला आहे. त्यामुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सहकार आयुक्तांकडे केल्याचे बँकेचे संचालक विनायक शिंदे, अविनाश गुरव यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शासनाने कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सहकारी बँकांना मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ ही एक वर्षापेक्षा जास्त होत असल्याने व सद्याच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढीला सभासदांचा कसलाही पाठिंबा नसल्याने शिक्षक बँकेवर प्रशासक नेमण्याची आवश्यकता आहे. याबाबत सहकार आयुक्ताकडे केली आहे.
शिक्षक बँकेने २०१९-२० मधील लाभांश रिझर्व्ह बँकेच्या बंधनामुळे वाटप केला नाही. आता रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली असल्याने तो व्याजासह सभासदांना द्यावा. सभासदांचे पैसे वर्षभर बँकेने वापरले आहेत, त्या रकमेला कायम ठेवीचा व्याजदर देऊन वाटप करावा, अशी मागणी शिंदे व गुरव यांनी केली आहे.
सद्या कोरोना महामारीमुळे कर्जाची मागणी घटली आहे, शिवाय ठेवीचा व्याजदर ही ६ टक्केच्या आसपास आहे. शासनाकडून शिक्षकांचे पगार ही वेळेत होत नाहीत. त्यामुळे बँकेने सभासदांना किमान ५ लाखांचे कर्ज ९ टक्के व्याजदराने देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी संचालक सुधाकर पाटील, महादेव हेगडे, श्यामगोंडा पाटील, बाजीराव पाटील, शोभा पाटील, पोपट सूर्यवंशी, अरुण पाटील, हंबीरराव पवार, शशिकांत माणगावे, धनंजय नरुले, संजय दिवे, फत्तेसिंग पाटील उपस्थित होते.