इस्लामपूर : मुले म्हणजे देवाघरची फुले, हे सुभाषित लहानपणापासूनच प्रत्येकाच्या ठायी बिंबलेले असते. मात्र याच सुभाषिताची प्रेरणा घेऊन येथील लाल चौकात फुलांचा व्यवसाय करणाऱ्या किरण माने यांनी गरिबीचे चटके सोसत आईचे छत्र हरपलेल्या श्रावणीला शिक्षणासाठी दत्तक घेऊन श्रावणात देवाला फुले वाहण्यापेक्षा माणुसकीतले देवपण जपले आहे.
ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील श्रावणी हणमंत गायकवाड या मुलीच्या आईचे लहानपणीच निधन झाले आहे. वडिलांनी जबाबदारीपूर्वक लक्ष दिले नाही. त्यामुळे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी उतार वयातील आजीवर आली. तिनेही मोठ्या जिद्दीने मोलमजुरी करुन श्रावणीचा सांभाळ केला. मात्र महागाईच्या या जमान्यात नातीचे पालन-पोषण व तिचा शैक्षणिक खर्च पेलताना आजीची फरफट होत होती.
येथील सक्षम फौंडेशनचे अध्यक्ष व फुलांचे व्यापारी किरण माने यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी ऐतवडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिकणाºया श्रावणीला लागणारे शालेय कपडे, वह्या, पुस्तके, व्यवसायमाला, स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य शाळेत जाऊन तिच्याकडे सुपूर्द केले.
श्रावणीचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत येणारा खर्च किरण माने उचलणार आहेत. ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या भावनिक कार्यक्रमात माणसातल्या या देवाचे पाठबळ मिळाल्याचे पाहून श्रावणी आणि तिच्या आजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले आणि उपस्थितांची मने हेलावून गेली. शाळेच्या वर्गाबाहेर पावसाच्या श्रावणधारा कोसळत असताना ज्ञानमंदिरात मात्र माणुसकीचा पाझर फुटला होता.
यावेळी स्वप्नील कुंभार यांनी सक्षम फौंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी केंद्रप्रमुख खोत, सरपंच प्रतिभा बुद्रुक, प्रशांत कुंभार, अमोल गायकवाड, उदय गायकवाड, प्रल्हाद माळी, अरविंद कुराडे, विनायक पाटील उपस्थित होते.