विटा : गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये वेजेगाव (ता. खानापूर) येथील श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक, अध्यक्ष आनंदराव उर्फ पिंटू (शेठ) देवकर व त्यांच्या पत्नी सुवर्णा देवकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देवकर कुटुंबियांनी कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्याला अंतिम टप्प्यात काही विघ्नसंतोषी व राजकीय हेतूने प्रेरित असलेल्यांनी खो घातला. यामुळे देवकर कुटुंबियांनी नियोजित कोविड सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेजेगाव येथील उद्योजक आनंदराव देवकर यांचे चिरंजीव सोहेल देवकर व कुटुंबियांनी वेजेगाव येथील दाजी पाटलोजी विद्यालयातील श्रीमती पुतळाबाई देवकर सभागृहात सुमारे २५ लाख रूपये खर्चून २६ बेडचे अद्ययावत कोविड रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कोविड सेंटरला काही विघ्नसंतोषी व राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या लोकांनी पडद्यामागून विरोध सुरू केला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात आलेले येथील कोविड रूग्णालयाचे काम थांबवून हे नियोजित कोविड सेंटर रद्द करण्याचा निर्णय देवकर कुटुंबियांनी घेतला आहे.
चौकट
कोविड सेंटर सुरु करणारच
कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता, वेजेगाव येथे २६ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्याला काहींनी विरोध केला. लोकांच्या सोयीसाठी खानापूर तालुक्यात ज्याठिकाणी जागा मिळेल, तेथे कोविड सेंटर सुरु करणार असल्याचे सोहेल देवकर यांनी सांगितले.