दत्ता पाटील -- तासगाव तासगाव नगरपालिकेकडून वर्षाला विकास कामांसाठी कोटीची उड्डाणे घेतली जात आहेत. वर्षागणिक निधीचा ओघ वाढत आहे. मात्र हा निधी खर्च करताना पालिकेकडून सल्लागार अभियंत्यांवर लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे. पालिकेत नियमित वेतनावर असलेल्या अभियंत्यांची वर्षापूर्वी बदली करण्याची किमया तत्कालीन कारभाऱ्यांनी केली. त्यानंतर पालिकेची सारीच भिस्त सल्लागार अभियंत्यांवर आहे. एकीकडे या अभियंत्यांवर होणारा लाखो रुपयांचा चुराडा आणि गुणवत्तापूर्ण कामाचा बोजवारा यामुळे पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.तासगाव नगरपालिकेसाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला, तर खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भाजपची नगरपालिका म्हणून खासदारांनीही स्वत:चे वजन वापरुन विशेष निधी मंजूर करुन आणला. या निधीतून पालिकेकडून कोट्यवधीची कामे झाली. नव्या कारभाऱ्यांच्या काळातही ही कामे होत आहेत. मात्र पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे कोट्यवधींचा निधी थेट विकास कामांऐवजी टक्केवारी आणि अन्य बाबींवरच जास्त खर्ची पडत असल्याचे चित्र आहे.नगरपालिकेसाठी मंजूर असलेल्या बहुतांश अभियंत्यांच्या जागा रिक्त होत्या, तर एका जागेवर अभियंता कार्यरत होता. मात्र पालिकेतील तत्कालीन कारभाऱ्यांनी या अभियंत्याच्या बदलीसाठी जोदार लॉबिंग केले होते. काही कारभाऱ्यांकडून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून या अभियंत्याच्या बदलीसाठी नेत्यांकडे वजन वापरुन त्याची बदली करण्यात यश मिळविले. या अभियंत्याच्या बदलीनंतर पालिकेच्या नव्या विकास कामांची सर्व भिस्त सल्लागार अभियत्यांवर आहे. पाच ते सहा सल्लागार अभियंत्यांची नेमणूक करुन नवीन कामांचा आराखडा तयार करण्यापासून, कामाची गुणवत्ता आणि पूर्ण झालेल्या कामाचे मोजमाप करुन बिल देण्यापर्यंतची कार्यवाही या सल्लागार अभियंत्यांकडून होत असते. या कामासाठी संबंधित अभियंत्यांना दोन टक्के रक्कम दिली जाते. या अभियंत्यांना केवळ केलेल्या कामाचा मोबदला, हा नियमित अभियंत्यांच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. किंबहुना या अभियंत्यांना संबंधित कामाची जबाबदारी सोडल्यास, अन्य कोणत्याच कामाचे बंधन अथवा जबाबदारी राहत नाही. इतकेच नाही, तर केलेल्या कामाच्या गुणवत्तेची बांधिलकीही राहत नाही. दुसरीकडे पालिकेकडून सल्लागार अभियंत्यांच्या सल्ल्यासाठी लाखो रुपयांची खैरात होत आहे.तत्कालीन कारभाऱ्यांनी सोयीची भूमिका घेत, कामापुरता मामा अशीच भूमिका घेतली. मात्र पालिकेचे हित साधून खर्च कमी करण्यासाठी कोणताच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा होणार चुराडा आणि दर्जाहीन कामाशिवाय तासगावकरांना अपेक्षित कारभार पाहायला मिळेल, याची शक्यता धूसर आहे. निधी मुरवण्यासाठीच अनेक कारभाऱ्यांनी मनमानी कामाचे प्रस्ताव सादर करुन मंजूर केले. अनेक गल्ली-बोळातील रस्त्यांवरील दगडी फरशीचा दर्जा चांगला असतानादेखील या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे उद्योग झाले. काही ठिकाणी चांगले डांबरी रस्ते असताना, त्या ठिकाणी आणखी चार-पाच वर्षे डांबरीकरणाची गरज नसताना, अशा ठिकाणी नव्याने डांबरीकरण करुन कोट्यवधीचा चुराडा करण्याचे उद्योग झाले. हे उद्योग होत असताना सल्लागार अभियंत्यांनी कामाशी मतलब ठेवला, तर कारभाऱ्यांनी सोयीशी मतलब ठेवला.तक्रारीपुरता मलमपट्टीचा बेलगाम कारभार तासगाव पालिकेत नवे कारभारी सत्तेत आल्यानंतर, जुन्या कारभाऱ्यांकडून मंजूर असलेल्या सोमवार पेठ आणि शिंंपी गल्लीतील रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. या डांबरीकरणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता. या रस्त्याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित माळी यांनी तक्रार केल्यानंतर, संबंधित अभियंत्यांनी नियमानुसार हे काम होत नसल्याची कबुली दिली होती. तसेच मुख्याधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कारवाई केली. मात्र प्रश्न केवळ या कामापुरता नाही. एखाद्या नगरसेवकाकडून तक्रार आली, तर तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. मात्र तक्रार नसल्यानंतर ते काम निकृष्ट असूनदेखील ना त्याची तपासणी होत, ना कारवाई, त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सल्लागार अभियंत्यांवर लाखोंची खैरात
By admin | Published: March 19, 2017 12:05 AM