सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे. नाईक मलेशियात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी येत्या मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी एकाच टप्प्यात न्यायालयीन प्रक्रिया राबवून या तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ इरण्णा कुंभार (वय २०, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), दीपक लिंबाजी माने (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (रा. जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.
मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. पण वर्र्कींग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत. गुरुनाथ कुंभार याचे मेहुणे नामदेव कुंभार (रा. इस्लामपूर) यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर या तरूणांना भारतात परत आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या आहेत.
राज्यातील चार तरुण मलेशियात अडकल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच परराष्टÑ सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु ठेवले. कागल येथील प्रवीण नाईक हे मलेशियात मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून या तरुणांना सोडविण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली. त्यानुसार नाईक यांनी शनिवारी या तरुणांना वकील मिळवून दिला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेचे शुल्क भरण्यात आले आहे. या तरुणांची सुटका करण्यासाठी दोन टप्प्यात प्रक्रिया राबविली जाते. पण मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून एकाच टप्प्यात न्यायालयाची सर्व प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. येत्या मंगळवारी चारही तरुणांना मलेशियातील न्यायालयात उभे केले जाणार आहे. यादिवशी सुटकेवर निर्णय आहे. सुटका होताच चारही तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्याची विनंती मुळे यांनी केली आहे.शहर पोलिसांचा तपास संथगतीनेकौस्तुभ पवार व धीरज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी, अजूनही शहर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. चार मुले मलेशियाच्या तुरुंगात अडकल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात येऊनही शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे. पोलिसपुत्र कौस्तुभ पवार यामध्ये मुख्य संशयित असल्याने पोलिसांचा तपास अत्यंत संथगतीने सुरु असल्याची चर्चा आहे. पवारचा सुगावा लागत नसल्याचा पोलिस कांगावा करीत आहेत. पण तो दुसºयाच्या मोबाईलवरुन फसगत झालेल्या तरुणांच्या पालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू, असे सांगत आहे.