शरद जाधवभिलवडी : बळीराजाला पावसाच्या आगमनाची शुभवार्ता देणारा कोकीळ, पावशा या भारतीय पक्ष्यांच्या जोडीला परदेशातून प्रतिवर्षी येणारा आफ्रिकन चातक पक्ष्याची पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावर एन्ट्री झाली आहे. हा आफ्रिकन पाहुणा यंदा उशिरा आल्याने उशिराच मान्सूनच्या पावसाचे आगमन होणार असल्याचा आडाखा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाने बांधला आहे.याचा रंग काळा-पांढरा, एखाद्या राजकुमाराच्या डोईवरील मुकुटाला शोभावा असा काळा तुरा, साळुंकी एवढा आकार, मात्र लांब शेपूट. शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा कोटच जणू. हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा शुभ्र. पंखांवर रुंद असा पांढरा पट्टा त्यामुळे तो आकाशात उडत असताना ओळखणे सोपे जाते. शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी व पाय काळसर निळे असतात. एकेकटे किंवा जोडीने आढळून येतो. हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावर दाखल झाला आहे.
रविवारी कृष्णाकाठ आमणापूर येथील नागोबा कट्टा परिसरात दोन चातक पाहायला मिळाल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली. २०१९ मध्ये १ जून, २०२० मध्ये ५ जून, २०२१ मध्ये १५ मे, २०२२ मध्ये १३ जून तर यंदा हा चातक दि. ११ जूनला कृष्णाकाठी आल्याची नोंद झाली आहे. संपूर्ण पावसाळा म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत त्याचा मुक्काम कृष्णाकाठी असतो. चातकाची वीण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात.कोकिळा, पावशा, कारुण्य कोकिळा, बुलबुल, रॉबीन या गाणाऱ्या पक्ष्यांसोबतच चातकाच्या सुरांची मैफल अनुभवायाची असेल तर थेट कृष्णाकाठ गाठावा.
सतभाईच्या घरात चातकाची अंडी...!कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यात भ्रूण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात घालते. रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यामधील चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून, त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो.