अविनाश कोळीसांगली : विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत वसंतदादांचे नातू मदन पाटील यांनी काँग्रेस आघाडीविरोधात प्रथमच बंडखोरीची नोंद केली होती. वसंतदादा घराण्यात त्यापूर्वी कुणीही पक्ष किंवा आघाडीविरोधात बंड केले नव्हते. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी आघाडीविरोधात पुन्हा बंड पुकारले आहे. दादा घराण्यातील बंडाची ही दुसरी घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आली आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत सोमवारी विशाल पाटील यांचे बंड कायम राहिले. त्यांच्या बंडामुळे वीस वर्षांपूर्वीच्या सांगली विधानसभा निवडणुकीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत यंदाच्या घटना व २००४ च्या घटनांमध्ये बरेच साम्य आहे. मदन पाटील त्यावेळी राष्ट्रवादीत होते. आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसला गेली. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या नावाचा फलक काढून टाकला होता.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धवसेनेला सोडण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या फलकाला पांढरा रंग फासला होता. २००४ प्रमाणेच बंडखोरी थांबविण्यासाठी मनधरणीच्या कहाण्या यंदाही नोंदल्या गेल्या. वसंतदादा घराण्यातील व्यक्तींनी २००४ पूर्वी पक्षीय आदेश पाळले होते. पक्षाचे दोरही याच घराण्याकडे असल्यामुळे बंड करण्याची वेळ कधीही दादा घराण्यावर आली नव्हती.
२००४ नंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. विधानसभेच्या निवडणुकीत बंड करून मदन पाटील यांनी अपक्ष म्हणून नव्या चिन्हासह निवडणूक लढविली. तशीच परिस्थिती २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्याबाबतीत निर्माण झाली आहे. त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकला आहे.. त्यांनाही नव्या चिन्हासह ही निवडणूक लढवावी लागत आहे.
लोकसभेला प्रथमच बंडखोरीसांगली लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात कधीही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याची नोंद नाही. या मतदारसंघावर सर्वाधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. २०१९च्या निवडणुकीतही काँग्रेसला जागा मिळाली नसल्याने विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत होते. मात्र, येथील जागा ज्या पक्षाला गेली, त्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिल्याने वादावर पडदा पडला होता.२००४ च्या बंडखोरीला यशसांगली लोकसभेच्या इतिहासात आजवर २००९ व १९९६च्या लढतीतच अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या मतदारसंघातून कधीही अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाही. २००४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही सांगली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधीही अपक्ष विजयी झाला नव्हता. मदन पाटील यांच्या माध्यमातून ही परंपरा मोडीत निघाली होती. मात्र, २००४ नंतरच्या निवडणुकांत अपक्ष उमेदवारांना यश मिळालेले नाही.